जळगाव (प्रतिनिधी) अकोला, खामगाव येथे संशयास्पद व्यवहार केल्यानंतर एका वाहनातून नेली जाणारी ६५ लाखांची रोकड अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली होती. ही रोकड जळगावच्या एका व्यापाऱ्याची असून ‘तो’ व्यापारी आज खामगाव पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी जाण्याची माहिती कळतेय. दुसरीकडे वाहन चालक मयूर नन्नवरे याला ११ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेले वाहन नाशिकच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या नावावर असल्याचे कळते.
पैशांचा मूळ मालक पोलिसांच्या रडारवर
खामगावात पोलिसांनी जप्त केलेल्या ६५ लाखांच्या रोकडचे ‘जळगाव कनेक्शन’चे समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेला ड्रायव्हर मयुर मंगल नन्नवरे (वय 21 वर्षे, मु.पो कढोली, ता.एंरडोल) याच्या मोबाईलमधून अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे याप्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळगावचा एक सराफ व्यावसायिकाचा पैशांवर दावा करत असल्याचे कळते. परंतू पोलिसांकडे चौकशीसाठी मूळ मालक न येता मुंदडा नामक दुसरा व्यापारी आला होता. त्याला पोलिसांनी धारेवर धरताच त्या व्यापाऱ्याने तेथून काढता पाय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ मालक आज पैशांवर दावा करण्यासाठी येणार असल्याचे कळते. पोलिस देखील मूळ मालक कोण याचा शोध घेत, त्याच्या मागावरच होते.
गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आणखी आरोपी असण्याची शक्यता !
पैशांची रोकड जप्त करण्यापूर्वी वाहनचालक मयुर नन्नवरे याने पीएसआय पंकज सपकाळे आणि पोलीस कर्मचारी गजानन आहेर यांना गंभीर जखमी केले होते. तसेच मयूरच्या मोबाईलमधून पोलिसांना काही संवेदनशील माहिती मिळाली आहे, त्यामुळे या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असण्याचा संशय पोलिसांना आहे. मयूरकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली असून गुन्ह्यात काही इतर नावे समोर आल्यास त्यांच्याविरुद्ध देखील अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलिसांकडून धागेदोरे शोधायला सुरुवात !
पोलीस चौकशीत अटकेतील वाहनचालक मयुर नन्नवरे हा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुये एवढी मोठी रक्कम त्याने कोठून आणली?, कोणाकडे देणारे होता?, तसेच ही रक्कम चोरीची किंवा रक्कम हवालाची तर नाही ना?, अशा अनेक बाजूंनी पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांच्या हाती काही प्राथमिक धागेदोरे लागले असल्याचेही कळते. दरम्यान, पकडलेले वाहन (एमएच ०५ सीए ४७२१) हे एका पोलिस कर्मचाऱ्याचे असल्याबाबत अपर पोलीस अधीक्षक एस. पी. दत्त यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी चौकशीअंती वाहन कोणाचे आहे?, हे समोर येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पैशांचा आणि कारचा मूळ मालक कोण ?, याचेच धागेदोरे पोलिसांनी आता शोधायला सुरुवात केली आहे.
खामगाव पोलीस तपासाला जळगावात येण्याची शक्यता !
वाहनचालक मयुर नन्नवरे याच्या मोबाईलमधून पोलिसांच्या हाती काही प्राथमिक धागेदोरे लागले असल्याचेही कळते. त्यामुळे खामगाव पोलीस जळगावात तसेच नाशिक, अकोला या ठिकाणी चौकशीला जाणार असल्याचे कळते. ज्या वाहनातून रक्कम नेली जात होती, ते वाहन नाशिकच्या एका महिला कर्मचाऱ्याच्या नावावर असल्याचे कळते. अगदी पोलिसांनी गुन्हयातील जप्त वाहनाची तांत्रीक तपासणी करावयास सुरुवात केली असल्याचेही कळते.
ड्रायव्हर मयूर नन्नवरेच्या मोबाईलची तांत्रीक तपासणीची शक्यता
ड्रायव्हर मयूर नन्नवरेच्या मोबाईलमध्ये पोलिसांना काही संवेदनशील माहिती मिळून आली आहे. अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी मयूर नन्नवरेचा मोबाईल ताब्यात घेतल्यावर काही संशयास्पद मॅसेज आणि व्हाट्सअप कॉल आढळून आले आहेत. यातील काही मॅसेज हे कोडवर्ड सारखे आहेत. अमुक गावाला इतके किलो, त्या गावाला इतके किलो असा काहीसा तो मॅसेज होता. यावरून ही रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी वाटप होणार होती का?, अशा स्वरूपाचे आहेत. त्यामुळे ड्रायव्हर मयूर नन्नवरेच्या मोबाईलची पोलीस तांत्रीक तपासणी करण्याची शक्यता आहे.
















