नाशिक (वृत्तसंस्था) डोळ्यासमोर आपल्या 19 वर्षीय तरुणीचं अपहरण केल्यामुळे घटनेच्या तासाभरातच आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी रविवारी (28 मे) रात्री उशिरा अपहरण करणाऱ्या समाधान झनकरसह त्याच्या साथीदाराविरोधात अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर संतप्त नातेवाईकांनी सोमवारी संशयित अपहरणकर्त्याच्या घरासमोरच या दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना भरवीर बुद्रुक ( ता. इगतपुरी) येथे घडली.
काय आहे प्रकरण?
भरवीर बुद्रुक येथील मंजुळा निवृत्ती खातळे (४०), निवृत्ती किसन खातळे (४७) हे दोघे आपल्या १९ वर्षीय मुलीला घेऊन विंचूर दळवी येथील तिचे मामा दिगंबर भीमा शेळके यांच्या घरी रविवारी दुपारी आले होते. काम आटपून हे तिघेही दुपारी एक वाजेच्या सुमारास पुन्हा विंचूरळी येथून पांडु मार्गे भरवीरकडे दुचाकीवर जाण्यास निघाले. यावेळी चारचाकीतून आलेल्या समाधान झनकरने आपल्या साथीदारांसह नाशिकच्या घोटी-पांढुर्ली महामार्गावरुन तरुणीचं अपहरण केलं. यावेळी खातळे दांपत्याला मारहाण केल्याचे तक्रारी म्हटले आहे. मुलीचं अपहण झाल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीने आई वडिलांनी रागाच्या भरात एक तासातच भगूर नानेगाव रेल्वे ट्रॅकवर गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली.
संशयित आरोपीच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार !
इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे या घटनेप्रकरणी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. उत्तरीय तपासणी केल्यानंतर सोमवारी सकाळी दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यत देण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी संशयिताच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करत संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी घोटी पोलिसांसह याठिकाणी दंगा नियंत्रण पथकाच्या १५ जणांची तुकडी तैनात करण्यात आली होती. मुलीच्या आई-वडिलांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर भरवीर बु. येथे आणण्यात आल्यानंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत नातेवाइकांना त्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोठा जनसमुदाय जमा झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दरम्यान, गावात तणावाच्या पार्श्वभूमीवर दंगा नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आले असून, सदर मुलीचा अद्याप तपास लागलेला नाही.
अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा अपहरण करणाऱ्या समाधान झनकर या तरुणासह त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहृत मुलीचा आणि आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात असून त्यासाठी रात्रीतूनच पथके रवाना करण्यात आली आहेत. हे प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्व बाजूने तपास केला जात आहे.
मुलीने लग्न केल्याची चर्चा !
दरम्यान, ताज्या वृत्तानुसार घटनेच्या दिवशी मुलीचे आई-वडील तिला प्रियकरासोबत जाऊ नको अशी जीवाचा आटापिटा करून मुलीला विनंती करत होते. मात्र आपल्या मुलीने आपले न ऐकता ती प्रियकरासोबत निघून गेल्याचे दुःख अनावर झाल्याने आई-वडिलांनी आत्महत्या केली. तसेच मुलीने आपल्या प्रियकरासोबत लग्न केल्याचेही कळतेय.