जळगाव (प्रतिनिधी) एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉड आणि पोटात चाकू भोसकून मोहन विजय हडपे (१८) या तरुणाचा बुधवारी (ता.१२) खून झाल्याची घटना वाघळी येथे घडली होती. गुन्ह्यातील फरार संशयित साजिद मुसा खाटीक (रा. वाघळी, ता.चाळीसगाव) याला मध्य प्रदेशातील खेतिया येथून गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील मोहन विजय हडपे (१८) या तरुणाचा गावातीलच सैय्यद मुसा खाटीक, साजिद मुसा खाटीक, आदिल साजीद खाटीक, तनवीर साजिद खाटीक, समीर सय्यद खाटीक यांनी लोखंडी रॉड डोक्यात टाकून व पोटात चाकूने भोसकून खून केल्याची घटना (ता.१२ ऑक्टोबर) घडली होती. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित साजिद मुसा खाटीक हा घटना घडल्या पासून फरार होता. तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संवेदनशील प्रकरण असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक किसन नजन पाटील यांचे पथक काम करत होती. संशयित साजीद हा मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पथकातील सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, उमोल देवढे, सुधाकर अंबोरे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, विनोद पाटील, उमेश गोसावी, प्रितम पाटील, मुरलीधर बारी अशांच्या पथकाने मध्यप्रदेशातील खेतिया या ग्रामीण भागात दडून बसलेल्या साजीद मुसा खाटीक याला एका शेतातून अटक असून त्याला चाळीसगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.