भडगाव (प्रतिनिधी) ऊसनवार दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरुन व जादूटोणा केल्याच्या संशयावरून येथील ७८ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील वरखेड येथील खदानीत घडली. याबाबत मयत वृद्धाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन एका २४ वर्षीय संशयिता तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने भडगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
उसनवार एक लाख रूपये दिले होते !
शहरातील पेठ भागात मयत सूपडू नाना पाटील (वय ७८) हे राहतात ते भगत असल्याने त्यांच्याकडे नेहमी लोकांची ये-जा होती. त्यांच्याकडे पेठ भागातील हितेश उर्फ कुणाल चुडामण मराठे (वय २४) हा देखील नेहमी यायचा. त्यामुळे त्याची कुटुंबातील सर्वांसोबत ओळख होती. त्यास सुपडू पाटील यांनी मार्च महिन्यात एक महिन्याच्या बोलीवर उसनवार एक लाख रूपये दिले होते. ते त्याने परत केलेले नाहीत. त्यामुळे ७ रोजी दुपारी हितेश मराठे यास त्यांनी फोन लावुन पैशांची मागणी केली. त्याने पैसे परत देण्याच्या कारणावरुन वडिलांशी अरेरावी केली होती, असे ज्ञानेश्वर पाटील याने सांगितले. तसेच ७ रोजी सायंकाळी ७.३० वाजेनंतर नेहमीप्रमाणे जेवण करुन पेठ चौफुलीवर सुपडू पाटील हे फिरण्यासाठी गेले. मात्र ते रात्रभर घरीच आले नाहीत. दरम्यान, ८ रोजी सकाळीही वडील दिसले नाहीत. त्यानंतर सुपडु पाटील हे मृतावस्थेत वरखेड गावाजवळ असलेल्या खदानीत आढळून आल्याचे समजताच ज्ञानेश्वरने घटनास्थळी धाव घेतली.
डोक्यावर, कपाळावर, चेहऱ्यावर पूर्ण रक्त !
मृत सुपडू पाटील यांच्या डोक्यावर, कपाळावर, चेहऱ्यावर पूर्ण रक्त तर शर्ट रक्ताने माखलेला होता. तसेच शरीरावर विविध ठीकाणी धारधार शस्त्राने वार केलेले दिसत होते. या संदर्भात पोलिसांनी लागलीच हितेश मराठे यास बोलावून विचारपूस केली असता त्यानेच ऊसनवारीने दिलेले पैसे परत करण्यावरुन व सुपडू पाटील यांनी जादुटोणा केल्याच्या संशयावरुन धारधार शखाने खुन केल्याची कबुली दिली. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर सुपड्डु पाटील यांच्या फिर्यादीवरुन हितेश मराठे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करत आहेत.
तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सहभाग !
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताला अवघ्या ५ तासात शोधून गुन्हा निष्पन्न करुन ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव आदींनी ही कार्यवाही केली
चॉपरने वार करीत वृद्धाला संपवले !
गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील संशयित हितेश मराठे याचा शोध घेऊन विचारपूस केली. त्याने वारंवार पैशांचा तगादा लावल्याने तुमचे पैसे दयायचे आहेत. तर वरखेडला एक जण पैसे देणार आहे, असे सांगत सुपडू पाटील यांना वरखेड गावाच्या दिशेने खदानीत घेऊन गेलो. तेथे त्यांच्यावर चॉपरने वार केले, अशी कबुली आरोपी कुणाल मराठे याने पोलिसांना दिली आहे.