मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंविरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मी महाराष्ट्रातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी, मुले आणि मालमत्तांबद्दल तथ्ये लपविल्याप्रकरणी आणि महत्त्वाची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली, असं किरीट सोमय्यांनी सांगितलंय.
बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना भारतीय सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकीकडे मुंडे यांच्यावर निशाणा साधतानाच दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपल्या प्रतिज्ञापत्रात दोन लग्नांचा उल्लेख केलेला नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. माहिती लपवून ठेवल्याने आयोगाने मुंडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागमी सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. धनंजय मुंडे यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन पत्नींची आणि सर्व मुलांची माहिती लपवली होती. तसेच त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती देखील त्यांनी लपवली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे. सोमय्या यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, ‘मी या पत्रासोबत महाराष्ट्रातील मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतची काही कागदपत्रे जोडलेली आहेत. त्या कागदपत्रांनुसार, मुंडे यांनी आपण दोनदा लग्न केल्याचं जाहीर केले आहे. आपण दोन्ही पत्नींची आणि मुलांची काळजी घेत असल्याचेही त्यांनी जाहिरपणे म्हटलेले आहे.
१२ जानेवारीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करून आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं होतं. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंधात होतो, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये खुलासा केला होता. त्यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवलाहोता. मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवते असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
















