जळगाव (प्रतिनिधी) कोळी समाजाचे जातीच्या दाखल्यांबाबत असलेल्या अडचणी, प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
जळगाव येथे कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली.
कोळी समाजाचे जातीच्या दाखल्यांबरोबर विविध प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. तेव्हा जळगाव येथील उपोषण मागे घेण्यात यावे. अशी विनंती ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेट दिलेल्या शिष्टमंडळात कोळी समाजाचे नेते आमदार रमेश पाटील व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते.