नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणाने देशात एकच संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, आता लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.
हिंसाचारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशीष शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकापुढे हजर झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची सुमारे ११ तास चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. हिंसाचारप्रकरणातील आरोपी आशीष याला अटक करण्यात आल्याची माहिती राज्य पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाचे प्रमुख उपेंद्र अगरवाल यांनी दिली.
लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोटारी घुसवून हिंसाचार घडवण्यात आला होता. त्यात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. गुन्ह्यातील आरोपी आशीष ३ ऑक्टोबरच्या हिंसाचारानंतर फरार झाला होता. या प्रकरणाच्या सदोष हाताळणीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर दबाव वाढला होता. सर्वच विरोधी पक्षांनी आणि देशभरातील शेतकरी संघटनांनी आरोपी आशीषच्या अटकेची मागणी केली होती. अखेर तो शनिवारी सकाळी पोलिसांपुढे हजर झाला.