लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेलं विशेष तपास पथक आता सखोल चौकशी करणार आहे.
लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने आशिषला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आशिष मिश्राला एसआयटीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे न्यायालयासमोर सादर करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आशिष मिश्राच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. वकील एसपी यादव यांनी सांगितलं की, आशिष मिश्राच्या तीन दिवसांच्या कोठडीसंदर्भात काही अटीही घालून देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी अर्ज दिला होता. सुनावणीमध्ये काही वेळासाठी व्यत्ययही आला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू असल्याने व्यत्यय आल्याची माहिती एका हिंदी वृत्तसंस्थेने दिली आहे. पोलिसांनी कोर्टात सांगितलं की, आशिष मिश्राची फक्त १२ तास चौकशी होऊ शकली, ज्यात त्याने उत्तरं दिली नाहीत. म्हणून त्याला १४ दिवसांच्या कोठडीत ठेवणे आवश्यक आहे. मात्र आता कोर्टाने १४ दिवसांऐवजी तीनच दिवसांची कोठडी सुनावली आहे.