छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीत मविआ नको आणि तिसरी आघाडीही नको. निवडणूक लढवायची की पाडायचे, याचा निर्णय अद्याप ठरलेला नाही. मात्र निवडणूक लढवायचे ठरवले तर आमचे सगळे उमेदवार अपक्ष असतील आणि नाही ठरले तर पाडापाडी अटळच आहे, असे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
मविआमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचा चेहरा घोषित करण्यावरून खलबते सुरू आहेत. त्यासाठी शिवसेना (उबाठा) आग्रही असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) मात्र त्यास विरोध आहे. तर रिपाइंचे नेते राजरत्न आंबेडकर यांनी, मनोज जरांगे हे आमच्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असे विधान केले. त्यावर जरांगे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. जरांगे पुढे म्हणाले की, मला महायुती, मविआ व इतर आघाडीशी देणे-घेणे नाही. तुमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगा. आरक्षण देणार असतील तर मी राजकारणाचा एक शब्दही काढणार नाही. भाजप नेते आरक्षण देत नसतील, तर समाजाचे वाटोळे करणाऱ्यांसोबत राहू नका, असा आवाहनवजा इशारा जरांगे यांनी मराठा नेत्यांना दिला. तसेच तुम्हाला जे काही साम-दाम-दंड-भेद वापरायचे ते वापरा, मात्र मराठ्यांच्या नादाला लागू नका, असा पुन्हा एकदा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिला. विधानसभा निवडणुकीत मी कुणालाही सोडणार नाही, असे सत्ताधारी व विरोधक यांना उद्देशून ते म्हणाले.
दरम्यान, आता माझी तब्येत ठीक आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता रुग्णालयातून सुट्टी घेऊन अंतरवालीला जाणार आहे. तिथे दसरा मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात बैठक आहे. हा मेळावा अठरापगड जातींच्या लोकांचा उत्सव आहे. मी भक्त आहे आणि तिथे येणारेही भक्त आहेत. गडावर मेळाव्याची तयारी जोरात सुरू असून ५२ हजार स्वयंसेवक कामाला लागलेले आहेत. त्यांच्याकडून गडावर जेवण, वैद्यकीय सुविधा, पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह आदी सुविधांची तयारी सुरू आहे. आपलाही दसरा मेळावा असला पाहिजे, अशी मराठा बांधवांची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ती इच्छा या मेळाव्याने आता पूर्ण होणार आहे, असेही जरांगे म्हणाले.