वर्धा (वृत्तसंस्था) विद्युत पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्तीची कामे करणाऱ्या तरुणाचा आर्वी तालुक्यातील लाडेगाव येथील मोक्षधाम परिसरात शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अक्षय गोपालराव गाडापेले (२०), असे मयत तरुणाचे नाव आहे. हृदयद्रावक म्हणजे माझ्या घरी उद्या घट असल्यामुळे आजचं काम आटोपून घेवू, असे अक्षयने मित्राला सांगितले. परंतू काम पूर्ण होण्यापूर्वीच अक्षयवर काळाने घाला घातला.
अक्षय गाडापेले हा शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्यादरम्यान आर्वी तालुक्यातील लाडेगाव येथील मोक्षधाम परिसरात कामावर गेला होता. त्याला काही मित्रांनी आपण रविवारी जावून काम करू असे सांगितले. अक्षयने माझे घरी घट असल्यामुळे उद्या शक्य होणार नाही. आजच काम आटोपून घेवू असे सांगितले व कामावर गेला होता. तळेगाव येथीलच कंत्राटदाराचे तेथे काम सुरू होते.
सिमेंट काँक्रीटचे काम झाल्यामुळे त्यावर पाणी टाकण्याकरिता शेजारी असलेल्या नाल्यावर मोटारपंप लावून पाणी घेण्यात येत होते. नाल्यातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अक्षय हा मोटारपंप बाजूला असलेल्या खड्डयात उतरविण्याचे काम करीत होता. कामाकरिता त्याच्यासोबत गावातीलच त्याचा मित्र सोबत होता. अक्षय हा वायर जोडत असताना अचानक त्या वायरमध्ये विद्युत प्रवाह कार्यान्वित झाला. अक्षयचे हाती वायर असल्यामुळे व तो नाल्यातील पाण्यात उभा असल्याने अक्षयला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. अक्षयच्या पश्चात आई-वडील व मोठा भाऊ तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.