जळगाव (प्रतिनिधी) शासकीय महिला रुग्णालयाचे डॉ. कासखेडकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी जितेंद्र देशमुख, जनता बँकेचे शाखाधिकारी प्रसाद कोपरकर, डॉ. रवी महाजन, डॉ. रेखा महाजन, डॉ. बेंद्रे, मनीषा पाटील, भानुदास वाणी, मनशक्तीचे अभय खांदे, प्रवीण गगराणी, सौ.अनघा गगराणी यांच्यासह महिला रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्येकी एक रोप लाऊन श्रमदान केले.
निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचे हाताने एक रोप लाऊन येणारा रविवार साजरा करा, असे जाहीर आवाहन प्रतिष्ठाणने वृक्षप्रेमी नागरिकांना केले होते. महिला शासकीय रुग्णालयात जाणाऱ्या मोहाडी रस्त्यापासून थेट रुग्णालयाच्या गेट पर्यंत वृक्षारोपण करण्यात आले. जनतेचा सहभाग असावा या हेतूने एक व्यक्ती एक वृक्षारोपण अशी संकल्पना राबविण्यात आली.१०० नागरिकांनी आज सहभाग नोंदवला. करंज चे १५० रोपं डॉ. रवी महाजन यांनी प्रतिष्ठाणला दिले तर अश्विनी पाटील यांनी आपल्या घरून पेरुचे पाच फूट उंचीचे कुंडीतील झाड वृक्षारोपण ठिकाणी आणून रुग्णालय परिसरात लावले.
शीतल छाया प्रकल्प असे नामकरण
संगोपण व संवर्धनाचे काम तीन वर्षे प्रतिष्ठाण करणार असून शीतल छाया प्रकल्प असे नामकरण करण्यात आले आहे. महिला रुग्णालय परिसरातील खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलवण्यासाठी या परिसरात गेल्या चार वर्षांपासून वृक्षारोपण करण्यात येत आहे व या पुढेही वृक्षारोपण करण्यात येईल अशी माहिती प्रतिष्ठाण चे सचिव वनश्री विजय वाणी यांनी दिली. मराठी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड. जमील देशपांडे, सौ संध्या वाणी, प्रो.सविता नंदनवार, घनश्याम चौधरी, डॉ. विद्या चौधरी, सौ कवीता पाटील, बाळू पाटील, संतोष क्षीरसागर, चेतन परदेशी, बाळू पाटील यांनी उपस्थित वृक्षप्रेमी नागरिकांसोबत श्रमदान करून वृक्षारोपण केले.