चाळीसगाव (प्रतिनिधी) कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून आणण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच मागून ती शाळेतच स्वीकारताना चाळीसगाव तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचा ग्रंथपालला रंगेहात अटक करण्यात आली. श्रीकांत गुलाब पवार (38), असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पवार यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शाळेतच लाच स्वीकारताना रंगेहात अटक !
करगाव आश्रमशाळेत कार्यरत 41 वर्षीय कर्मचारी या प्रकरणात तक्रारदार आहेत. तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी ‘फोन पे’ वर पवार यांनी 15 हजारांची लाच स्वीकारली होती व त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नतीची थकीत रक्कम 85 हजार 519 टक्केप्रमाणे 12 हजारांची लाच पवार यांनी शुक्रवारी मागितल्यानंतर त्यात तडजोड होवून सात हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवताच सापळा रचून ग्रंथपालला शाळेतच लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी !
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे व पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक किशोर महाजन, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.