यवतमाळ (वृत्तसंस्था) जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अनेक भागात पाऊस कोसळला. यात सोमवारी ४ सप्टेंबर रोजी वणी व मारेगाव तालुक्यात वीज कोसळल्याने महिलेसह एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मनोज पांडुरंग गोहकार (३३) रा. दहेगाव, ता. वणी असे मृताचे नाव आहे.
मृतक गोदाळा शिवारातील शेतात काम करीत होता. दुपारी अचानक आकाशात काळे ढग तयार होवून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान मृतक आंब्याच्या झाडाखाली असलेल्या झोपडीमध्ये आसरा घेण्यासाठी गेला असता वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आईवडिल, पत्नी व दोन लहान मुले असा आप्त परिवार आहे.
मागील २४ तासात जिल्ह्यात एकूण २१.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक ५१.१ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात झाला आहे. त्यासोबतच राळेगाव ३७.२, मारेगाव ३६.०, झरी जामणी ३२.२, उमरखेड २६.८, तर वणी येथे २४.६ मिमी पावसाची नोंद घेण्यात आला आहे. तर सर्वात कमी पाऊस यवतमाळ, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस, नेर येथे झाला आहे. वणी व मारेगाव तालुक्यात मागील दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामध्ये रविवारी एका शेतकऱ्यासह तीन जनावरांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. तर आज सोमवारी पुन्हा विजेच्या तांडवात वणी व मारेगाव येथे एका महिलेसह तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
















