जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. आभासी विकास दाखविणार्या केंद्र सरकारप्रमाणेच यंदाचा अर्थसंकल्प हा निव्वळ आभासी आहे, अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली.
केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणारी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आधीच्या योजनांनाच वाढीव निधी देण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी जनतेला दिलासा मिळेल, अशी कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. फक्त आभासी विकास दाखविणार्या केंद्र सरकारप्रमाणेच यंदाचा अर्थसंकल्प हा निव्वळ आभासी आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
ते म्हणाले की, देशात सध्या नैराश्याचे वातावरण असून शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य कामगार, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील कर्मचारी हे अडचणीत आलेले आहेत. अर्थव्यवस्थेचा गाडा अद्यापही रूळावर आलेला नाही. त्यामुळं बजेटमध्ये काही तरी ठोस तरतुदी होतील, अशी अपेक्षा असतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र केवळ आभासी आणि आकडेवारींचा खेळ करणारा बजेट सादर केला असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केलीये.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पूर्णपणे फसलेली असून, यातून कोणताही विकास साधण्यात आलेला नाही. तरीही अर्थसंकल्पात पुन्हा तेच तुणतुणे वाजविण्यात आले आहे. केंद्र सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हा अर्थसंकल्प गोरगरिबांच्या, शेतकरी आणि कष्टकर्यांसह मध्यमवर्गीयांच्या जखमांवर मीठ चोळणारा असल्याची टीका देखील पालकमंत्र्यांनी केली.
 
	    	
 
















