उज्जैन (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये दोन बहिणींचं लग्न सुरू होतं. या लग्नातच लाईट गेली आणि जे काही घडलं ते अगदी एखाद्या मालिकेच्या कथानकाला शोभेल असंच होतं. लाईट गेल्यामुळे भर मांडवात नवरा-नवरींचीच अदलाबदल झाली. त्यानंतर सप्तपदीवेळी ही चूक सुधारण्यात आली.
जिल्ह्याच्या इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अजब प्रकार घडला. रमेशलाल यांच्या तीन मुली आणि एका मुलाचा विवाह होता. त्यापैकी दोन मुली, निकिता आणि करिश्मा यांचा विवाह दंतेवाड्यातील भोला आणि गणेश यांच्याशी झाला. दोघींनीही एकसारखे कपडे घातले होते आणि डोक्यावर पदरही घेतला होता. त्यामुळे लग्नाच्या वेळी झालेल्या या अदलाबदलीबद्दल कोणाला कळलंही नाही.
दोन तरुण वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. वरात आल्यानंतर रात्री ११.३० वाजता माता पूजनाचा विधी झाला. दोन नवरदेवांनी वेगवेगळ्या वधूंचा हात धरून पूजा केली. निकिताचा विवाह भोलाशी आणि करिश्माचं लग्न गणेश सोबत ठरलं होतं. पूजा सुरू होण्याच्या आधी वीज पुरवठा खंडित झाला. रात्री १२.३० च्या सुमारास वीज आली. त्यावेळी निकिताच्या हातात गणेशचा आणि करिश्माच्या हातात भोलाचा हात होता. हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.
पंडितांनीही दोन्ही नवरदेवांना या बदललेल्या वधूंसोबत सप्तपदी घेण्यास सांगितलं. जेव्हा हे दोन्ही नवरदेव आपापल्या वधूंना घेऊन घरी परतले, त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. दीर्घकाळ वादविवाद झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मध्यम मार्ग काढला. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा या वधूवरांना सगळे विधी करावे लागले.
गावात विजेची समस्या असल्याचं ग्रामस्थांनी सांगितले. गावात दररोज वीज जाते. कित्येक तास वीज पुरवठा खंडित असतो. त्याचमुळे विवाह सोहळ्यात वधू-वराची अदलाबदल झाल्याचं गावकरी म्हणाले.