फैजपूर (प्रतिनिधी) नगरपरिषदेत विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार येथील ललित नामदेव चौधरी व निलेश मुरलीधर राणे यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे लेखी तक्रारी करून पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी यांनी याकामी एक स्थानिक चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीच्या अहवालानुसार नगरपालिकेने केलेल्या विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने तत्कालीन अधिकारी/कर्मचारी हे दोषी आढळून आले. यामुळे नगरपालिका गटात खळबळ उडाली आहे.
मागील काही वर्षांमध्ये फैजपुर नगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कर्तव्य ठिकाणी न राहता शासनाकडून उकळलेला निवास भत्ता, बोगस टी ए व डी ए अलाऊंसच्या रक्कमा तसेच विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार येथील रहिवासी ललित नामदेव चौधरी व निलेश मुरलीधर राणे यांनी वेळोवेळी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे लेखी तक्रारी करून पाठपुरावा केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी याकामी एक स्थानिक चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीत फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी अहवाल तात्काळ पाठवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने या चौकशी समितीचे स्थानिक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी सखोल चौकशी करून आपला अहवाल जिल्हाधिकार्यांना तात्काळ पाठविला. या चौकशी समितीच्या अहवालानुसार तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीत समितीला तथ्य आढळून आले. नगरपालिकेने केलेल्या विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने तत्कालीन अधिकारी/कर्मचारी हे सकृत दर्शनी दोषी आढळून आले आहेत.
या दोषींवर पुढील कारवाईसाठी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सदर अहवाल राज्याचे प्रधान सचिव, नगरविकास विभाग मुंबई यांना दि. १० मार्च २०२१ रोजी संबंधितांवर पुढील उचित कारवाईसाठी पत्र दिले आहे. ठेकेदाराचा मनमानी कारभार व अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष अशा लाखो रुपये भ्रष्टाचाराच्या या प्रकरणी शासन संबंधितांवर काय कारवाई करते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.