जळगाव (प्रतिनिधी) मद्यधुंद पोलिसांचा हॉटेलबाहेर जोरदार राडा झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलसमोर घडली. दारुच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या कर्मचारी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने त्यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. त्यानंतर कार पार्कीगमधून बाहेर काढत असतांना तेथील दुचाकींना धक्का दिला, त्यानंतर भरधाव वेगाने जात असतांना काही अंतरावर एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले. सुदैवाने सायकलस्वार मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलसमोर घडली.
शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये चार ते पाच पोलिस कर्मचारी गणवेशावर जॅकेट घालून त्याठिकाणी आले. दुपारच्या सुमारास त्यांनी दारु रिचवल्यानंतर ते त्याठिकाणाहून निघून गेले. मात्र काही वेळाने पुन्हा त्या हॉटेलमध्ये येवून पुन्हा मद्यपान करु लागले. सायंकाळपर्यंत दारु रिचवल्यानंतर त्यातील एक जण टुल्ल झाल्याने हॉटेलमध्ये त्यांच्याकडून दोन ग्लास फुटले. त्यानंतर ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हॉटेलबाहेर पडत असतांना त्यांच्यात कुठल्या तरी कारणावरुन वाद झाला.
हॉटेलबाहेर आल्यानंतर पार्कीगच्याठिकाणी दारुच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची सुरु होती. यामध्ये एक जण गणवेशावर असलेल्या पोलिसाच्या अंगावर धावून आला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी त्यांच्यात मध्यस्ती करीत अडविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या धरपकड होवून एक जण रस्त्यावरील चिखलाच्या डबक्यात पडला. यावेळी त्याचे संपुर्ण अंग चिखलाने माखलेले होते. दरम्यान, हे कर्मचारी जिल्ह्यातीलच असून ते जळगावात बंदोबस्तासाठी आल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरु होती.
दारुच्या नशेत तर्रर्रर्र झालेले पोलिस कर्मचारी पोलिसांचा लोगो असलेल्या (एमएच ०२, ईएच १०४८) क्रमांकाच्या कारमध्ये बसले. कार पार्कीगमधून बाहेर काढत असतांना त्यांनी दोन दुचाकींना धक्का देत पाडल्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार कशीतरी बाहेर काढून ते भरधाव वेगाने जात असतांना तेथून जाणाऱ्या एका कारचालकाला त्यांनी धडक दिली. यामध्ये सायकलस्वार मुलगा हा रस्त्यावर पडला, मात्र कार त्याठिकाणी न थांबता तेथून भरधाव वेगाने निघून गेली. या घटनेत सुदैवाने सायकलस्वाराला कुठलीही दुखापत झाली नाही.
पोलिसांमध्ये सुरु असलेल्या वादापासून ते त्यांनी सायकलस्वाराला दिलेल्या धडकेची संपुर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी त्याठिकाणी पोहचले. मात्र कारचालक पसार होताना दिसल्याने त्यांनी पाठलाग केला. मात्र तो भरधाव वेगाने निघून गेला होता.
















