छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने घराशेजारीच सासुरवाडीत असलेल्या पत्नीला घरी नेऊन पतीने पत्नी, चार वर्षांच्या मुलीचा खून करत स्वतःही गळफास घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मोहन प्रताप डांगर (वय २८ वर्ष), पूजा मोहन डांगर (वय २४ वर्ष), श्रेया मोहन डांगर (वय ४ वर्ष) अशी तिघां मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे मोहन आणि पूजाचा प्रेम विवाह सर्वांच्या संमतीने झाला होता.
स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार वाळूज औद्योगिक परिसरातील वळदगाव येथील एका घरात पती, पत्नी व चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने शुक्रवारी खळबळ उडाली होती. पत्नी व मुलीला एकाच दोरीने गळफास दिल्याचे घटनास्थळी दिसून आले. तसेच पतीनेही गळफास घेतला होता. पतीने यापूर्वीही पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. मोहन हा पत्नी पूजा व मुलगी श्रेया यांच्या सोबत वळदगावात चार महिन्यांपासून भाड्याने राहत होता. परंतू कौटुंबिक कलहामुळे पत्नी पूजा आपल्या मुलीसह आईसोबत राहत होती.
गुरुवारी रात्री तिघांनीही घरालगतच राहणारी पूजाची आई शोभाभाई मेहर यांच्या घरी जेवण केले. त्यानंतर रात्री साधारण १० च्या सुमारास मोहन लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक घेऊन सासुरवाडीत आला. पत्नीला, ‘चल घरी आपण वाढदिवस साजरा करू,’ असे म्हणून तिला घरी सोबत येण्याची विनंती केली. त्यानुसार पूजा, श्रेया व मोहन घरी पोहोचले. सकाळी ९ वाजले तरी मुलगी आणि नात घरी आले नाही, म्हणून शोभाबाई ह्या जावयाच्या घरी गेल्यात. बराच वेळ दरवाजा ठोठावून तसेच आवाज दिल्यावरही आतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी शेजारच्या लोकांना आवाज देऊन बोलवून घेतले. शेजारच्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पण घरातील दृश्य बघताच सर्वांचा थरकाप उडाला.
रात्री लग्नाचा वाढदिवस साजरा करताना दोघा पती-पत्नी काहीतरी वाद झाल्याने केक कापण्याच्या अगोदरच मोहन याने पत्नी पूजा हीस मारहाण करून तिला गळफास दिला. यानंतर श्रेया हिलाही मोहन याने गळफास देऊन स्वतः आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण घटनास्थळी केक तसाच पडून होता. दरम्यान, मोहन व त्यांची पत्नी पूजा यांच्यात सतत होणारे वाद पोलीस स्थानकापर्यंत गेले होते. बुधवारीही मोहन व पूजा या दोघांत भांडण झाल्याने मोहन याने पत्नी पूजाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर पूजा हिने आई शोभाबाई हीस सोबत घेऊन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. पत्नीने आपल्या विरोधात तक्रार दिल्याची माहिती मिळताच त्याने सासू शोभाबाई व पत्नी पूजा सोबत पुन्हा वाद घातला होता. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी मोहनने लिहिलेली सुसाईड नोट मिळून आली असून त्यात त्याने सासूवर गंभीर आरोप केले असल्याचे कळते.
















