जळगाव (प्रतिनिधी) विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखवून भडगाव तालुक्यातील एका तरुणाची तब्बल ५ लाख २९ हजार ५०८ रुपयात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन भामट्यांविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, ४ फेब्रुवारीपासून तर आजपर्यंत दिपक कुमार तिवारी व हेमंत सरकार असे नाव सांगणाऱ्या दोन अनोळखी इसमांनी स्वतःची ओळख लपवून मो.क्रं. ८११६७९९३१८ व ९५४०२८३४६१ यावरुन दिपक पितांबर चौधरी (वय- ३८. व्यवसाय- शेती, रा.गुढे.ता. भडगाव) यांच्या मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधला. तसेच त्यांना अविवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखवले. परंतू प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता दीपक चौधरी यांना वेगवेगळे कारणे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन एकूण ५,२९,५०८.६० एवढी रक्कम स्विकारुन फसवणूक केली. या प्रकरणी दिपक कुमार तिवारी व हेमंत सरकार, असे नाव सांगणाऱ्या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. बी. डी. जगताप हे करीत आहेत.