धुळे (प्रतिनिधी) साक्री शहरातील दौलत बंगल्यावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी तरुणीने स्वतःच अपहरण व दरोड्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला आहे. तरुणीला पळवून नेणे, त्यानंतर अचानक तिला टाकून आरोपी फरार होणे आणि लगेच ती घरी परत आल्याने संशय बळावला आणि पोलिसांनी कसून तपास केल्यावर एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणेच सगळं प्रकरण समोर आले. संशयित तरुणी निशा मोठाभाऊ शेवाळे (वय २३) हिनेच दरोडा व स्वतःच्या अपहरणाचे नाट्य रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी विनोद भरत नाशिककर (वय ३८, रा. गायत्रीनगर, शाजापूर, मध्य प्रदेश) व रोहित संजय गवळी (वय २२, रा. मोगलाई, धुळे) यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं होतं !
साक्री शहरातील एका परीवारातील कर्ता पुरूष बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीसह त्यांची भाची घरी असताना रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास हिंदी भाषा बोलणार्या एका 30 ते 35 वयोगटातील दरोडेखोरांनी प्रवेश केला व त्यानंतर अन्य चार संशयितांनी तोंडाला मास्क बांधून घरात प्रवेश केला. यावेळी चाकूसह पिस्टलाचा धाक दाखवून महिलेला हिंदीतच दागिण्यांची विचारणा करण्यात आली व यावेळी महिलेला धमकावून मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी तिजोरीतून 88 हजार 500 रुपयांचे दागिने लुटले तर यावेळी 23 वर्षीय तरुणीचे हात बांधून तिचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा अपह्यत तरुणी मध्य प्रदेशातील सेंधवा येथे पथकाला मिळून आली. यानंतर दरोडेखोरांचा तपास सुरू होता. दरम्यान, संबंधित तरुणीवरच संशय बळावल्याने तिला विश्वासात घेत विचारणा केली असता तरुणीनेच दरोडा व अपहरणाचे नाट्य रचल्याचे धक्कादायक माहिती सांगितली.
लव के लिए कुछ भी करेगा…!
संशयित आरोपी विनोद नाशिककर हा विवाहित असून त्याने रायपूरबारी सौरऊर्जा प्रकल्पात ठेका घेतला होता. त्यावेळी तो आदर्शनगरात निशा हिच्या घराशेजारी भाड्याने राहत होता. येथेच दोघांची ओळख व प्रेमप्रकरण झाले. तो येथून परिवारासह त्याच्या मूळ गावी परतल्यानंतरही फोन आणि इन्स्टाग्रामवरून संपर्क कायम होता. दोघांना एकमेकांसोबत राहायचे होते. तरुणीला वडिलांच्या समोरून पळून जाणे ज शक्य नव्हते. त्यामुळे मुलीच्या आत्याच्या घरून दरोडा व अपहरणाचा कट रचण्यात आला होता.
प्लान फसताच तरुणीला पाठवले घरी !
निशाचा भाऊ कौतिकशी ओळख असल्याने विनोद हा फोनद्वारे घटनेची माहिती तिच्या वडिलांकडून घेत होता, मात्र पोलिस अधीक्षकांनी साक्रीत घटनास्थळी भेट दिल्याची माहिती मिळताच त्यांना कळून चुकले की, प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. त्यामुळे त्यांनी प्लान बदलला आणि निशाला परत पाठवायचे ठरवले. त्यानंतर दोघे इंदूरला आले. तिथे रिक्षाने इंदूरच्या ट्रॅव्हल्स पॉइंटचर पाठवले. निशाने २६ रोजी रात्री आठला एका प्रवाशाच्या मोबाइलवरून विनोदला कॉल करून सेंधव्याच्या ट्रॅव्हल्समध्ये बसल्याचे सांगितले. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर धुळे पोलिसांनी २७ रोजी निशाला सोबत नेत आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
चार साथीदारांसह केले अपहरण नाट्य !
मोठाभाऊ शेवाळे हिच्या शेजारी (आदर्शनगर, साक्री) मे २०२२ ते मे २०२३ दरम्यान भाडेकरू म्हणून राहत होता. यावेळी विनोद व निशाची ओळख झाली. दरम्यान शाजापूरला गेल्यानंतरही तो निशाशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात होता. पळून जाण्यासाठी सोयीचे म्हणून निशा २२ नोव्हेंबरपासून तिची आत्या ज्योत्स्ना नीलेश पाटील (रा. सरस्वतीनगर, साक्री) यांच्याकडे तात्पुरती राहण्यास गेली. दरोड्यासाठी विनोदने सोबत काम करणारे अमन सिंग व चरण सिंग (रा. शिरसा, हरियाणा) यांना बोलावून घेतले. चार साथीदारांसह सेंधव्याजवळील (रा. मध्य प्रदेश) धामनोर या गावी २५ नोव्हेंबरला दुपारी अडीचला ते एकत्र आले व तिथून कारने साक्रीला सायंकाळी साडेसातला पोहोचले. यावेळी निशा तिच्या आत्याकडे येऊन विनोदशी संपर्कात होती. त्यानंतर रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास सर्व प्रकार घडला.