जळगाव (प्रतिनिधी) नव्याने सुरु झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजाशी बांधलं जावं, महाविद्यालयीन युवा शक्तीचा उपयोग समाज बांधणी व पर्यायाने देश बांधणीसाठी व्हावा हे उद्दिष्ट ठेऊन “समुदाय सहभाग कार्यक्रम” समाविष्ट करण्यात आला आहे. या निमित्ताने के.सी.ई. सोसायटीच्या, मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी, इंडिया व ग्रामपंचायत, टाकरखेडा यांच्या संकुत विद्यमाने दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी मौजे टाकरखेडा, ता.एरंडोल येथे विविध आयाम असलेला “अष्टसूत्री कार्यक्रम” आयोजित केला होता. या कार्यक्रमांतर्गत सामाजिक दृष्टीने महत्वाचे असलेले आठ विषय विचारात येऊन विविध उपक्रमाचे आयोजन गावात व गावातील शाळेत करण्यात आले होते. यात विद्यापीठ अनुदान आयोगाने सूचित केलेल्या “स्वच्छता पंधरवाडा” अंतर्गत देखील काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अष्टसूत्री कार्यक्रमात मुख्यत्वे स्वच्छता व आरोग्य, पर्यावरण संरक्षण, शिक्षण व समाज, आजार व उपाययोजना, प्लास्टिक मुक्त परिसर, व्यसनमुक्ती, जैविक खते व शेती आणि आदिवासी शिक्षण व विकास योजना या विषयांवर संबोधन, प्रचार, प्रसार व जनजागरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावाचे सरपंच प्रविण पाटील, ग्रामविस्तार अधिकारी हर्षल शिरसाठ व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद पाटील उपस्थित होते. वरील विविध विषयावर विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके प्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांसाठी खेळ, पथनाट्य, मौखिक चर्चा, प्रत्यश मुलाखती व संबोधन, प्रभात फेरी या विविध पद्धतीने उद्बोधन व जनजागरण केले. शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता विभागाने जिल्हा परिषद शाळेत डॉ. दिपेंद्र पाटील यांच्या विशेष सहकार्याने ‘आरोग्य तपासणी शिबीर’ आयोजित केले. सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.सौ. नयना पाटील यांनी काम केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विभागप्रमुख प्रा.डॉ.केतन नारखेडे, प्रा.राजेश सगळगिळे व प्रा. श्रेया पांडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. संजय भारंबे व मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी, इंडियाचे अध्यक्ष प्रा.डॉ. अरविंद देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे व विभागाचे अभिनंदन केले.
सरपंचांनी व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी केली विशेष चर्चा:
कार्यक्रमात गावाचे सरपंच प्रविण पाटील, ग्रामविस्तार अधिकारी हर्षल शिरसाठ यांनी विशेष उपस्थिती देत विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधला. यावेळी गावात केलेली विविध विकास कामे, पाण्याचे नियोजन, रस्ते, कचरा संकलन व विल्हेवाट, शिक्षणासाठी उपाययोजना यावर सरपंच प्रविण पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर गावासाठी असलेल्या विविध वित्त आयोग योजना, जल-जीवन मिशन, ग्रामनिधी, पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान, जैवविविधता योजना, दलित वस्ती विकास, ठक्कर योजना, महिला विकास व आरोग्य या सर्व बाबतीत ग्रामविस्तार अधिकारी हर्षल शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे समाधानकारक निराकरण करण्यात आले.
डॉ. दिपेंद्र पाटील यांच्या विशेष सहकार्याने ‘आरोग्य तपासणी शिबीर’ :
जळगाव येथील डॉ. दिपेंद्र पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेत ‘आरोग्य तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापक शरद पाटील यांनी डॉ. दिपेंद्र पाटील यांचे स्वागत करत आभार व्यक्त केले. शिबिरादरम्यान शाळेतील एकूण १२६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात प्रामुख्याने कान, नाक, घसा तपासणी, पोटाचे विकार, डोळे, पोषण व वैयक्तिक स्वच्छता इत्यादी बाबींचा समावेश केला. यावेळी डॉ. दिपेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना वैयक्तिक स्वच्छता, पोषक आहार, व्यायाम याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार भित्तीपत्रके प्रदर्शन, पथनाट्य व खेळातून केले विद्यार्थ्याचे उद्बोधन :
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि. ०१ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत देशभरात राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता पंधरवाडा’ उपक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आयोजित अष्टसूत्री कार्यक्रमात सुक्ष्मजीवशास्त्र पदवीच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी व गावकरी लोकांसाठी भित्तीपत्रके प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात मुख्यत्वे अस्वच्छेतेमुळे पसरणारे डेंगू व मलेरिया, वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य, ग्रामीण भागात स्वच्छेतेचे महत्व, विविध जीवनी व विषाणूमुळे होणार आजार या विषयावर भित्तीपत्रके प्रदर्शनातून व पथनाट्यातून उद्बोधन करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांनी योगा, कॅन्सर, हृदयरोग, अमली पदार्थांचे व्यसन व परिणाम, व्यसनमुक्ती इत्यादी विषयांवरही जनजागरण करण्यात आले. सुक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन केले आणि त्यातून त्यांचे प्रबोधन केले. अशाप्रकारे स्वच्छेतेचे धडे टाकरखेडा येथील शालेय विद्यार्थ्यांना गावकरी लोकांना देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
 
	    	
 
















