नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ज्याप्रमाणे दुधात साखर विरघळते त्याप्रमाणे ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये विरघळून गेले आहेत, अशा शब्दात शिवराज सिंह चौहान यांनी सिंधिया यांचं कौतुक केलं आहे. काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाला जनतेने नाकारलं आहे. मोदींजींच्या कामाला लोकांची पसंती आहे, मध्य प्रदेशचा विजय हा लोकांचा विजय आहे, असं शिवराज म्हणाले.
देशात एकीकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धुराळा उडत आहे. दुसरीकडे याचवेळी देशातील ११ राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर होत आहे. यात मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशसह आणखी ८ इतर राज्यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशमध्ये २८ जागांवर, गुजरात ८, उत्तर प्रदेश ७ , मणिपूर ५ , नागालँड २, ओडिशा २, झारखंड २ , कर्नाटक २ , हरियाणा १ , तेलंगाणा १, छत्तीसगड १ जागेवर पोटनिवडणूक होत आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयाने मध्य प्रदेश भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. मध्य प्रदेश पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसमधून भाजपात गेलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आमदार जास्त करुन निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.
या समर्खत आमदारांना निवडून आणण्याचं आव्हान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यापुढे होतं. हे आव्हान सिंधिया यांनी तितक्याच ताकदीने पेललं आहे. सिंधिया समर्थकांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी सिंधिया यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पैकी भाजपला १६ ते १८ जागा मिळतील तर कॉंग्रेसला १० ते १२ जागा मिळतील, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. या अंदाजानुसार मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आपलं सरकार वाचवू शकतील. पण काँग्रेस नेते कमलनाथ हे जवळपास १२ जागा जिंकण्याच्या स्थितीत आहेत. यामुले कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या शिंदे समर्थक आमदारांना मोठा झटका बसू शकतो.