जळगाव (प्रतिनिधी) परिपूर्ण सेक्रेटरी कसा असावा याचे आदर्श उदाहरण बघायचे झाले तर ते महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांचे घेता येईल. थोर विचारवंत, लेखक व प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक महादेव देसाई हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबत आयुष्यभर सावलीसारखे राहिले. या २५ वर्षांच्या काळात त्यांनी लेखन केलेल्या डायरीतून महात्मा गांधींच्या जीवनातील महत्त्वाच्या नोंदी, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख घटनांबाबत संदर्भ आजही बघायला मिळतात याबाबतची माहिती एस.एन.डी.टी युनिव्हर्सिटीच्या इतिसाहाच्या प्रोफेसर तथा जीआरएफ रेसिडेंशिअल फेलो डॉ. प्रभा रविशंकर यांनी उपस्थितांना सांगितली. ‘महादेव देसाई अ कंप्लेट सेक्रेटरीयट’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे डॉ. सुदर्शन आयंगार, अंबिका जैन आणि डीन डॉ. गीता धर्मपाल यांची उपस्थिती होती.
आरंभी डॉ. प्रभा रविशंकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा परिचय गीता धर्मपाल यांनी करून दिला. डॉ. प्रभा यांनी महादेवभाई देसाई यांच्याबाबत सांगितले की, त्यांचे बहुआयामी व्यक्तीत्व होते. त्यांचे हस्ताक्षर सुंदर होते, भाषेवर प्रभुत्व होते ते चांगले भाषांतरकार होते. त्यांच्या लेखनात फारच अचूकता असे, इतकी अचूकता स्वल्पविरामाची चूक होत नसे. महात्मा गांधीजी आणि त्यांच्या संबंधाबाबत अनेक प्रसंगही त्यांनी श्रोत्यांसमोर सांगितले. १९१७ ते १९४२ अशी २५ वर्षे त्यांनी महात्मा गांधीजींची समर्पित सेवा केली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान कसे महत्त्वपूर्ण होते याबाबतचा त्यांचा पैलू त्यांनी सांगितला.
चंपारण सत्याग्रहाचा प्रसंग आणि पुरीच्या जगन्नाथ मंदिरात महादेवभाई देसाईंनी जाणे या दोन कारणांमुळे झालेले त्यांच्यातील मनमुटाव या प्रसंगाबाबतही त्यांनी उपस्थितांना सांगितले. महादेवभाई एक मल्टी टॅलेंट व्यक्तीमत्व होते. ते मुगल गार्डन मधील एक गुलाब होय असे वर्णन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपले समाधान करून घेतले. यावेळी नाट्यकर्मी रमेश भोळे, डॉ. प्रभा यांचे पती रविशंकर, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी, पीडी, पीजी डिप्लोमाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुदर्शन आयंगार यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले.