मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रामधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. या मोर्चाला महाविकास आघाडीतील पक्षांनी पाठिंबा दिला आहे. ‘कंगनाला भेटण्यासाठी आपल्या राज्यपालांकडे वेळ आहे, पण आमच्या शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. असे राज्यपाल महाराष्ट्रानं कधीही पाहिले नाहीत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर तोफ डागली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चात सहभागी झाले. यावेळी त्यांनी मोर्चाला संबोधित केलं. पवार म्हणाले की, जो शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतो, त्याला समाजकारणातून उध्वस्त करण्याची ताकद आमच्या आहे, हे तुम्ही आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले. तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं, असं शरद पवार म्हणाले. पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वगळता हमीभाव देण्याचे काम आम्ही केले होते. पंजाबच्या शेतकऱ्यांनी संबंध देशाला पुरेल इतका गहू, तांदूळ उत्पादित केला असता तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मालाची १००% खरेदी करण्यास सांगितले. पण आताचे सरकार खरेदी करायला तयार नाही. घटनेची पायमल्ली करून हा कायदा आणण्याचा प्रयत्न झाला. संसदीय संकेत उद्ध्वस्त करत बहुमताच्या जोरावर कायदा पास करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या देशातला सर्वसामान्य माणूस हा कायदा व तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त करेल, असं शरद पवार म्हणाले. मुंबईने स्वातंत्र्यलढ्यात आक्रमक भूमिका घेतली होती व स्वातंत्र्यलढ्याला योगदान दिले. त्यानंतर मराठी भाषकांच्या राज्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला. आज ही मुंबई पुन्हा शेतकरी व कष्टकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पुढे आली आहे, असं ते म्हणाले.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना सत्ताधारी भाजपकडून ‘खलिस्तानी’ संबोधण्यात आलं होतं. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. या सगळ्याचा पवार यांनी समाचार घेतला. ‘दिल्लीत फक्त पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. पण ते पाकिस्तानी आहेत का? किंवा ते कोणी ऐरेगैरे आहेत का? त्यांनीच आजवर देशाचं संरक्षण केलं आहे,’ असं पवार म्हणाले.