मुंबई (वृत्तसंस्था) फोन टॅपिंग प्रकरणावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात जो फोन टॅपिंगचा पॅटर्न (Phone Tapping in Maharashtra) होता तोच पॅटर्न आता गोव्यातही दिसून येत आहे. महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेच गोव्यात निवडणुकीचे प्रभारी होते असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिगंचा पॅटर्न राबवला जात आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भेटले होते. त्यांनीही त्यांचे फोन टॅप केले जात असल्याची भीती व्यक्त केली होती. काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. मी त्यांना सांगितलं तुमचेच फोन टॅपिंग होत नाहीत तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत त्यांचेही फोन टॅप होत आहेत. फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकार सुरू आहे. गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे, अशी टीका करतानाच महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. आम्ही काळजी घेत आहोत. तसेच दिगंबर कामत यांच्यासोबत आम्ही आहोत, असं त्यांना सांगितल्याचंही राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.
महाराष्ट्रात फोन टॅपिंगचा विषय परत एकदा सुरू झाला आहे. एकनाथ खडसे आणि माझे फोन टॅप होत होते. त्याबद्दल कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एक गुन्हा पुणे बंडगार्डनला दाखल झाला आहे. निवडणुकीनंतर ज्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळी ही फोन टॅपिंग झाले. आम्ही कुणाशी बोलतो, कुणाला भेटतो, काय करतो ही माहिती त्यावेळच्या पोलीस अधिकारी कुणाला देत होते हे सर्वांना माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यांना एखाद्या राज्यात सत्ता आणायची असेल तर राज्यपाल, फोन टॅपिंग, केंद्रीय तपास यंत्रणा यातून राजकारण केलं जातं. हे सर्व वापरून तुमची सत्ता येत नसेल तर केबीजी आणि सीआयएही आणा, असा हल्लाही त्यांनी चढवला.