मुंबई (वृत्तसंस्था) देशभरात करोना लसी पोहचविण्यात येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात लसी पोहोचण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र महाराष्ट्राला अपेक्षित होत्या त्यापेक्षा कमी लस मिळाल्याचे समोर आले आहे. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर लसी कमी दिल्याचा आरोप केला आहे.
पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही ५११ वरुन ३५० पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. राजेश टोपे म्हणाले की, “मला समाधान आहे, आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांच्या नावाची नोंदणी केली आहे. त्याच्या तुलनेत लसीचे डोस थोडे कमी आले आहेत. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल. तसेच १५ जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस १०० टक्के पोहोचणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “१६ जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रातील दोन रुग्णालयं एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय पंतप्रधानांशी यावेळी थेट संवाद साधू शकणार आहेत. अशा प्रकारे १६ जानेवारीला देशासह राज्यात लसीकरणाचं उद्घाटन केलं जाणार आहे.”
लसीकरण केंद्रांबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, “दोन दिवसांपूर्वी मी नियोजन केलं होतं की, ते ५११ लसीकरण केंद्रासाठी केलं होतं. पण काल झालेल्या बैठकीत केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने सूचना दिल्या की, लसीकरण एवढ्या मोठ्या स्तरावर करु नका. कारण लसीकरणासोबतच रुग्णालयातील इतर सेवाही सुरळीत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्या ५११ वरुन ३५० पर्यंत कमी करण्यात आला आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० जणांना लस देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे.”
दरम्यान ज्या व्यक्तीला डोस द्यायचे त्याला पूर्ण डोस द्या. मात्र तब्बल ५५ टक्के डोस कमी आले आहेत. आपल्याला आठ लोकांचे लसीकरण करायचे होते. मात्र डोस कमी आल्याने आपल्याला केवळ ५ लाख लोकांना लसीकरण करता येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. आपण आठ लाख लोकांना अपलोड केल्याचे समाधान आहे. मात्र त्याच्या तुलनेत लस कमी आल्या आहेत. जेवढ्या लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्या आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत विभागीय कार्यालयात उपलब्ध होणार असल्याचे टोपेंनी सांगितले.