पालघर (वृत्तसंस्था) माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाल्यानंतर महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी सातपाटी सागरी पोलिसांनी पाच तरुणांना अटक केली असून अन्य सहा तरुणांचा शोध घेत आहेत.
माहीम पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर ११ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्यानंतर त्या मुलीने माहीम पोलिस चौकी गाठत या तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर सातपाटी सागरी पोलिस स्टेशनमध्ये पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आला. दरम्यान, आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे. अन्य सहा तरुणांच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.