हिमाचल प्रदेश (वृत्तसंस्था) हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये अचानक वातावरण बिघडल्यानं आणि मोठ्या बर्फवृष्टीनं अनेक पर्यटक अडकले. याच दरम्यान, महाराष्ट्रातील तीन ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १० ट्रेकर्सला सुखरुप बाहेर काढण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आलंय.
महाराष्ट्रातील १२ आणि पश्चिम बंगालच्या एका ट्रेकर्ससहीत १३ ट्रेकर्स रोहरू – बरुआ कांडा मार्गानं किन्नौरच्या सांगलाकडे जात असताना ही दुर्घटना घडली. १३ ट्रेकर्ससहीत गाईड आणि शेर्पा असे एकूण २२ जण या टीममध्ये सहभागी होते. मोठी बर्फवृष्टी झाल्यानं बरुआ कांडा भागात हे ट्रेकर्स अडकून बसले. या ट्रेकर्सपैंकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर १० जणांना रेस्क्यू करण्यात आलंय. जवळपास १५ हजार फुटांवर ट्रेकर्संचा मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, यामध्ये दीपक राव, राजेंद्र भालचंद्र पाठक आणि अशोक मधुकर भालेराव या महाराष्ट्रातील तीन ट्रेकर्सचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवाई दल आणि आयटीबीपीची टीम मृतदेह ताब्यात घेण्यासाठी लवकरच घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.