कोलकाता (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेत. ममता दीदी पिछाडीवर असून तृणमूलची चिंता वाढली आहे.
देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यापैकी हाय व्होल्टेज निवडणूक समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टेन्शनमध्ये आल्या आहेत. भाजपाने कडवी टक्कर दिली असून सुरुवातीच्या कलांमध्ये एक आणि दोन आकड्यांच्या फरकाने तृणमूल पुढे असल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये ९६ जागांवर सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेस ४९ आणि भाजपा ४७ जागांवर पुढे दिसत आहे. तामिळनाडूमध्ये डीएमके १०, तर एडीएएमके १ जागेवर पुढे आहे. तर आसाममध्ये भाजपा ५, काँग्रेस ३ जागांवर पुढे दिसत आहे. केरळमध्ये एलडीएफ ३१ काँग्रेस २७ भाजपा ३ जागांवर पुढे दिसत आहे.
धक्कादायक म्हणजे सुरुवातीला पोस्टल मतदान मोजणी करण्यात आली. यामध्ये भाजपाने जोरदार टक्कर दिली आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आघाडीवर तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत.
यावेळी बंगालमध्ये टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक प्रचारात ४४ दिवस व्हीलचेअरवर प्रचार करत होत्या. पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये सुमारे २० जाहीर सभा घेतल्या आणि अमित शहा यांनी सुमारे ७० रॅली काढल्या. टीएमसी उमेदवाराच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी यांनी सुमारे १५० जाहीर सभांना संबोधित केले.