मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. मंदाकिनी खडसे आज ईडी कार्यालयात दाखल झाल्या त्यानंतर त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली आहे. भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.
पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात मंदाकिनी यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांना कोर्टाकडून जरी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला असला, तरी देखील त्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावेत असे आदेश त्यांना न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत. त्यानूसार मंदाकिनी खडसे या ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. यावेळी त्यांची अडीच तास चौकशी करण्यात आली. दरम्यान याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीकडून एकनाथ खडसे यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली होती. यामध्ये लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे.
काय आहे भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल, २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं. याप्रकणी आता इकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी आणि परिवाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे.