नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, केंद्र आणि राज्य सरकारं लढाई देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. तसंच कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. सर्व सेक्टरच्या लोकांनी सल्ले दिले आहेत. राज्य सरकारही आपल्या पातळीवर काम करत आहे, असं ते म्हणाले. कोरोना काळात केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळपासच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ आणि संशोधकांच्या सल्ल्यांची गरज आहे. राज्य सरकारांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.
पंतप्रधानांनी देशभरातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलची मतं जाणून घेतली. त्याचबरोबर लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. यावेळी डॉ. शशांक जोशी यांच्याशी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘तुमच्या विचारातील स्पष्टता मला आवडली. आपण सध्या दिवसरात्र काम करत आहात. आपण लोकांना दुसऱ्या लाटेबद्दल सांगावं. कोरोनाची दुसरी लाट कशी वेगळी आहे आणि काय काळजी घ्यायला हवी?,’ असा प्रश्न मोदींनी केला. त्याला उत्तर देताना शशांक जोशी म्हणाले,”दुसरी लाट खूप वेगानं आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा यावेळी विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. चांगली बाब ही आहे की, रिकव्हरी रेट आहे आणि मृत्यूदर खूप कमी आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये आणि मुलांमध्येही दिसून येत आहे. लक्षणांमध्ये आणखी भर पडली आहे. लोकं घाबरलेले आहेत. पण, घाबरण्याची गरज नाही. ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. म्युटेशनमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. विषाणू येत जात राहतो,” असं शशांक जोशी म्हणाले.