धुळे (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील रहिवासी असलेला २५ वर्षीय जवान चीन सीमाहद्दीवरील सिक्कीमच्या डोंगरावर कर्तव्य बजावून परत येत असताना त्याचा पाय घसरून ६०० ते ७०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. शुक्रवारी रात्री उशिरा जवानाचा मृतदेह गावी आणण्यात येणार आहे. मनोज संजय माळी असे मयत जवानाचे नाव आहे.
शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील मनोज संजय माळी हे चार वर्षापुर्वी भारतीय सैन्यात भरती झाले होते. मनोज माळी यांनी एसपीडीएम महाविद्यालयात शिक्षण घेतले असून २०१७-१८ या वर्षी एसपीडीएम महाविद्यालयात ते एनसीसी कॅडेट होते. गुरुवार, दि. ६ जुलैच्या पहाटेच्या सुमारास सिक्कीमच्या डोंगरावर रात्रीची ड्युटी करून परत येत भगवाना मनोज संजय माळी या जवानाचा पाय निसटला. सुमारे ६०० ते ७०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. या जवानांसोबत शिरपूर येथील जवान विलास महाजन हे असल्याने त्यांनी लागलीच घटनेची माहिती शिरपूर व वाघाडी येथील मयताच्या आप्तजनांना कळविली.
दरीत पडलेला मृतदेह ६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. यानंतर शहीद जवान मनोज माळी यांचे पार्थिव सध्या स्क्किीम मधील सैन्यदलाच्या रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. पार्थिव वाघाडी येथे येण्यासाठी कधी रवाना होईल, याची माहिती अद्याप कळविण्यात आलेली नाही. मृतदेह शुक्रवारी सायंकाळी गावात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनोज माळी यांच्यावर वाघाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मनोज माळी हे एनसीसीचे अंडर ऑफिसर व सैन्य दलातील १६९ मिडियम रेजिमेंट येथील लान्स नायक म्हणून कार्यरत होते. शहीद मनोज माळी यांच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे.