मुंबई (वृत्तसंस्था) बॉडीबिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं निधन झालं. जगदीश अवघ्या ३४ वर्षाचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
जगदीशला काही दिवसापूर्वी कोरोना झाला होता. त्याच्यावर गुजरातमधील बडोदा इथं उपचार सुरु होते. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदशीसारख्या धष्टपुष्ट तरुणाला कोरोना हतबल करत असेल, तर जे कोणी कोरोनाला सिरियस घेत नसेल, त्यांनी आता पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
जगदीश लाड हा नवी मुंबईत राहात होता. त्याने मागील वर्षीच गुजरातमधील बडोदा इथं जीम सुरु केली होती. त्यामुळे तो तिकडेच असायचा. जगदीशला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगचं आकर्षण होतं. त्यामुळे पिळदार शरीरयष्टीच्या जगदीशने महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा गाजवल्या. त्याने नवी मुंबई महापौर श्रीसह मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं पटकावली होती.