नाशिक (वृत्तसंस्था) दोन महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मोराणे सांडस (ता. बागलाण) येथे घडली. दीपक सुरेश अहिरे (वय २४) व रेखा दीपक अहिरे (वय १९) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे.
शेतमजुरी करून ते आपली उपजीविका करत होते. सोमवारी या दाम्पत्याने नामपूर शिवारात बाबुराव आनंदराव सावंत यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या बाभळीच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक व रेखा यांचा अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, अचानक दोघांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. ३) सकाळी नामपूर शिवारात बाबूराव आनंदराव सावंत यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या बाभळीच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
पोलीस पाटील योगेंद्र पाटील यांनी जायखेडा पोलीस ठाण्याला माहिती दिली. नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. दोघांचाही विवाहाला विरोध असल्याने पटत नव्हते, एकमेकांना स्वीकारत नव्हते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मृत रेखाबाई हिचे माहेर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दमणार येथील आहे.
















