मुंबई (वृत्तसंस्था) मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या अल अदील सुपर स्टोअर्स साखळीने विस्ताराचा सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला आहे. डॉ. धनंजय दातार यांच्या हस्ते ५० व्या अल अदील सुपर स्टोअरचे उद्घाटन नुकतेच दुबईत झाले. याप्रसंगी अल अदील समूहाचे संचालक वंदना दातार, हृषिकेश दातार, रोहित दातार आदी उपस्थित होते. जुमैरा व्हिलेज सर्कल परिसरातील रिव्हेरा अपार्टमेंटमध्ये हे प्रशस्त स्टोअर सुरू झाले आहे.
अल आदिल ग्रुपचे सीएमडी मसालाकिंग डॉ. धनंजय दातार म्हणाले, यंदा संयुक्त अरब अमिरातीचेही (युएई) सुवर्ण महोत्सवी वर्धापन वर्ष साजरे होत असून ते इयर ऑफ द फिफ्टीथ जाहीर करण्यात आले आहे. या टप्प्यावर आमच्याही ५० व्या सुपर स्टोअरचे उद्घाटन हा सुखद योगायोग आहे. संयुक्त अरब अमिरात आणि त्याचे शासक यांच्याप्रती मी अत्यंत कृतज्ञ आहे. व्यापाराला भक्कम प्रोत्साहन व सर्वतोपरी मदत देण्याच्या त्यांच्या धोरणांमुळेच येथे उद्योजकीय संस्कृती बहरली असून अनेक व्यावसायिक व नवउद्योजकांना विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अल अदील समूहाच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचे संपूर्ण श्रेय माझे आई-वडील, कुटूंबीय, कर्मचारी, हितचिंतक, सहयोगी व ग्राहक यांना आहे.
डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ‘अल अदील ट्रेडिंग’ने ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या पिकॉक या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा मसाला किंग एक्स्पोर्ट्स या नावाने मुंबईत कार्यरत आहे. अल अदील समूहाचे ५० आऊटलेट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त २ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड नावाने मुंबईत आहे. अल अदील समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने दुबईसह ओमान, बहारीन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.