गंगटोक (वृत्तसंस्था) सिक्कीमचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या गंगटोकमध्ये मंगळवारी झालेल्या भीषण हिमस्खलनात 6 पर्यटकांचा बळी गेला, तर 150 जण बर्फात अडकल्याची माहिती समोर येत आहे. मृतांत 1 महिला व एका मुलासह इतर 4 पुरुषांचा समावेश आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार भीषण हिमस्खलनामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 150 पर्यटक बर्फात अडकल्याचे वृत्त आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दुर्घटना घडलेल्या भागात 13 व्या मैलाच्या माइलस्टोनपर्यंत जाण्याचा पास जारी केला जातो. त्यापुढे जाण्याची परवानगी नाही. पण हे पर्यटक जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14व्या माईलस्टोनपर्यंत गेले. नेमका तिथेच हा अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने या ठिकाणी तातडीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 22 जणांची सुटका करण्यात आली. यातील 6 जणांना खोल दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी 12.20 च्या सुमारास गंगटोकला नाथुला पासशी जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर ही घटना घडली.