पालघर (वृत्तसंस्था) तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट जे-१ मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य चार कामगार जखमी झाले आहेत. तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी असून आग नियंत्रणात आली आहे.
तारापूर एमआयडीसी परिसरातील प्लॉट जे-१ मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाला. कंपनीच्या बॉयलरमध्ये ब्लास्ट झाला. ब्लास्ट इतका भयंकर होता की त्यानंतर कंपनीला भीषण आग लागली. या ब्लास्टची तीव्रता इतकी होती की त्याचा आवाज ४ किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मुत्यू झाला आहे, तर चार कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांवर बोईसरमधील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. भीषण स्फोटाने तीन ते चार किलोमीटरच्या परिसराला हादरला बसला आहे.