वर्धा (प्रतिनिधी) शहरानजीक असलेल्या भूगाव येथील उत्तम गलवा कंपनीत सकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला असून यामध्ये कर्तव्यावर असणारे २६ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात ७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
वर्ध्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कंपनीमध्ये फरनेसचं काम चालू होतं. त्यावेळी अचानक एअर पास होऊन कोळसा अंगावर उडाला. कोळसा अंगावर उडाल्याने जवळपास २६ कामगार जखमी झाले आहे. या घटनेमुळे कंपनीत एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर तातडीने काम थांबवण्यात आले आणि २६ कामगारांना सावंगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये ७ जण गंभीर जखमी झाले असून ३० टक्के भाजले आहे. जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. कंपनीत अचानक ही घटना घडली कशी, या प्रकाराबद्दल कंपनी व्यवस्थापनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.