पणजी (वृत्तसंस्था) स्टार्टअप कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असलेल्या महिलेने आपल्या ४ वर्षांच्या मुलाची गोव्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हत्येनंतर मृतदेह बॅगमध्ये कोंबून ही महिला टॅक्सीने कर्नाटकला पोहोचली होती. सूचना सेठ (वय ३९ )असे आरोपी महिलेचे नाव असून सोमवारी रात्री कर्नाटकच्या चित्रदुर्गमधून तिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच मोठ्या शिताफीने गोवा पोलिसांनी अटक केली.
हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु प्राथमिक चौकशीनुसार आरोपी महिलेची तिच्या इंडोनेशियातील जकार्ता येथे राहणाऱ्या विभक्त पतीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असताना प्रत्येक रविवारी मुलगा पतीच्या ताब्यात दिला जावा, अशी मुभा देण्यात आली होती. मात्र, आरोपी महिलेचा या गोष्टीला विरोध होता, अशी माहिती समोर आली आहे. तिच्या पतीला मुलाच्या हत्येबाबत कळविण्यात आले आहे. शनिवार, ६ जानेवारी रोजी आरोपी महिला आपल्या चार वर्षीय मुलासोबत उत्तर गोव्यातील कैडोलिमध्ये भाडेतत्त्वावरील सदनिकेत थांबली होती. दोन दिवसांनंतर सोमवारी महिलेने तेथील कर्मचाऱ्याला बंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सीची व्यवस्था करण्यास सांगितले. पण टॅक्सीऐवजी विमानाचा पर्याय किफायतशीर असल्याचे त्या वेळी कर्मचाऱ्याने म्हटले. पण तिने टॅक्सीची सोय करण्याचा आग्रह धरला. अखेर टॅक्सीने महिला निघून गेल्यानंतर कर्मचारी फ्लॅटमध्ये स्वच्छतेसाठी गेला असताना त्याला टॉवेलवर रक्ताचे डाग आढळले.
कर्मचाऱ्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. तसेच महिला परत जाताना तिच्यासोबत मुलगा नव्हता ही बाबही त्याने पोलिसांना सांगितली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी महिलेला फोन करून रक्ताचे डाग आणि मुलाबाबत विचारणा केली. महिलेने रक्ताचे डाग हे आपल्या मासिक पाळीचे असून, आपला मुलगा मित्रासोबत गोव्यातच असल्याचे सांगत पोलिसांना एका ठिकाणचा पत्ता दिला. पोलिसांनी लागलीच संबंधित पत्त्यावर तपासणी केली असता महिलेने चुकीची माहिती दिल्याचे आढळले. पोलिसांनी यानंतर टॅक्सी चालकाशी संपर्क साधत महिलेला चित्रदुर्ग जिल्ह्यातील जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. चित्रदुर्ग पोलिसांनी महिलेच्या बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये मुलाचा मृतदेह आढळला. यानंतर गोवा पोलिसांनी चित्रदुर्गमध्ये जाऊन महिलेला ताब्यात घेतले. तिच्याविरोधात हत्या, पुरावे नष्ट करणे आणि गोवा बाल कायद्याच्या विविध तरतुदींतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी गोव्यातील मापुसा न्यायालयाने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मुलाच्या हत्येनंतर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाजही पोलिसांनी वर्तविला आहे.