नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यात महाविकास आघाडी सरकार पुन्हा कोसळण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सध्या राज्यात अनागोंदी कारभार सुरू असून भाजपचे सरकार सत्तेत नसल्याने सरकार अस्थिर असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्च महिन्यात भाजपचं सरकार येणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी जयपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाहीये त्यामुळे तिथे तसं होत आहे. लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल. मार्च महिन्यात भाजपचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित असा बदल दिसून येईल. नारायण राणे पुढे म्हणाले, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. जाहीरपणे गोष्टी गेल्या तर एखादा महिना सरकार आणखी राहिल आणि मग भाजपचं सरकार येण्याची तारिखही पुढे जाईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या राजकीय भविष्यवाणीवर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही, संख्या बळावर चालतं आघाडीकडे पूर्ण संख्याबळ आहे आणि हे सरकार ५ वर्षे पूर्ण करेल.
यापूर्वी ही काही पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणत आलेत – वर्षा गायकवाड
दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी नारायण राणेंच्या विधानावर प्रतिक्रिया देत म्हटलं, नारायण राणे पुन्हा सरकार येईल म्हणत असतील यापूर्वी ही काही पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणत आलेत. केंद्रीय मंत्र्याने असे स्टेटमेंट देतांना भान ठेवले पाहिजे.