जळगाव (प्रतिनिधी) शहरात एलईडी बसविण्याचे काम सुरू असून शनीपेठेत लावलेल्या एलईडीची महापौर भारती सोनवणे यांनी मंगळवारी सायंकाळी पाहणी केली. दरम्यान, काही एलईडी बंदवस्थेत आढळून आल्याने ते तात्काळ सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
शहरात एलईडी बसविण्याच्या कामाला गती मिळाली असून शनीपेठ, गवळीवाडा, रिधुरवाडा, काट्याफैल परिसरात एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी सायंकाळी महापौर भारती सोनवणे यांनी परिसरात पायी फिरून कामाची पाहणी केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, मुकुंदा सोनवणे, चेतन सनकत, किशोर चौधरी, भाजप मंडळ अध्यक्ष अनिल जोशी, परेश जगताप, मनपा विद्युत विभागाचे एस. एस.पाटील आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महापौरांनी परिसरात फिरून नागरिकांशी चर्चा केली. एलईडीचा प्रकाश आणि सर्वत्र एलईडी बसविल्याने कसे वाटते हे महापौरांनी जाणून घेतले.
बंद एलईडी दुरुस्तीच्या सूचना
परिसरात पाहणी करताना गवळीवाडा भागात काही एलईडी बंद असल्याचे आढळून आले. महापौरांनी अधिकाऱ्यांना सूचना देत बंद असलेले एलईडी तपासण्याचे आणि एलईडी लावल्यानंतर परिसरात पाहणी करायला एका अधिकाऱ्याला पाठविण्याचे देखील त्यांनी सांगितले.