
जळगाव, शहाबाज देशपांडे : जळगाव जिल्ह्यातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) तसेच लोकप्रतिनिधी यांची बैठक सोमवारी (२८ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मतदार यादीशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादीसंदर्भातील विविध मुद्दे आणि तक्रारी मांडल्या. यावेळी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, तक्रारींचे निराकरण तसेच मतदार यादीतील अचूकता आणि पारदर्शकता राखण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्तांनी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच प्रक्रियेदरम्यान नियमांचे काटेकोर पालन करून प्राप्त तक्रारी व सूचनांवर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.















