
जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणचे दुरुस्तीचे काम करत असताना विजेच्या धक्क्यात महावितरणच्या वायरमनचा मृत्यू झाला. सोमवारी दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना कुसुंबा विमानतळापुढे हॉटेलसमोर घडली. महेश देविदास अपार (वय ३५, रा. इंद्रनगर, कुसुंबा) असे मयताचे नाव आहे. महावितरणच्या लाईनवर दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत प्रवाह बंदचे परमिट घेतले होते. काम सुरु झाल्यानंतर विद्युत प्रवाह सुरू झाला कसा? असा प्रश्न नातेवाईकांनी करत रुग्णालयात शंका उपस्थित केली.
महेश अपार हे दहा ते बारा वर्षापासून महावितरण विज कंपनीत ठेकेदारी पध्दतीने वायरमन म्हणून कार्यरत होते. कुटुंबियांच्या माहितीनुसार, कुसुंबा विमानतळ परिसरापुढे चिचोलीकडे हॉटेलसमोर विद्युत वाहिनीत दुरुस्ती करायची होती. याकामासाठी महेश अपार सह महावितरणचे दोन वायरमन असे तिघे साईटवर आले.
विद्युत प्रवाह बंद संदर्भात परमीट घेतल होतं. त्यानंतर महेश अपार याना पोलवर चढविण्याचे सांगितले. त्यानुसार महेश हे पोलवर चढले. काम करण्याला सुरुवात करताना त्यांनी तार घेताच त्यांना विजेचा जोरात धक्का बसला आणि ते कोसळले. ही घटना ११.३० वाजेच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत वायरमन महेश अपार यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात याचित्र नितीन सोनवणे हलविले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मदतीची मागणी, महावितरण कार्यालयात तणाव
महावितरणने या कुटुंबाला तातडीने भरीव अशी आर्थिक मदत द्यावी. कुटुंब वाऱ्यावर राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. मयताच्या पत्नीला पेशंन सुरु करण्यात यावे, अशा मागण्या यावेळी नातेवाईकांनी केल्या. मदतीचे लेखी निवेदन महावितरणने द्यावी, अशी आग्रही भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने रुग्णालयात तसेच महावितरण कार्यालयात पेच निर्माण झाला होता. जिल्हापेठ तसेच महावितरण अधिकारी, ठेकेदार यांनी संवाद साधत चर्चेला सुरुवात केली होती.
मजुरी करत कुटूंबाचा उदरनिर्वाह
वायरमन महेश यांच्या पश्चात पत्नी, सात वर्षाचा एक मुलगा, दहा वर्षाची मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. हात मजुरी करणारा हा परिवार असुन कुटुंबाची मोठी जबाबदारी निभावण्याचे दायित्व वायरमन महेश हे निभावत होते. त्यांच्या निधनाने कुसुंब्यासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आवाज देणाऱ्या कोणाच्याही कामाला धावुन जाणारे महेश वायरमन हे समाजात परिचितच नव्हे तर लोकप्रियही होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
















