
जळगाव (प्रतिनिधी) – कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. योजनेचा लाभ घेत वीजग्राहक राजू पांडुरंग पाटील यांनी केवळ ३० हजार २५० रुपये भरून तब्बल २३ हजार ६४७ रुपयांची बचत केली.
वराड बु. येथील राजू पाटील यांच्याकडे वीजबिलाची एकूण ५३ हजार ८९७ रुपये थकबाकी होती. त्यामुळे २०१६ मध्ये त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला होता. काही कारणांनी त्यांना बिल भरता आले नाही. दरम्यान, नुकत्याच आलेल्या महावितरणच्या अभय योजनेबाबत अधिकाऱ्यांनी पाटील यांना अवगत केले. व्याज, बिलंब आकार माफ तसेच एकरकमी भरणा सूट मिळत असल्याने योजनेचा लाभ घेण्यास पाटील राजी झाले. त्यांनी ३० हजार २५० रुपये मूळ थकबाकी एकरकमी भरली. त्यामुळे २३ हजार ६४७ रुपयांची सवलत मिळाली. योजनेमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. योजनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बिल भरल्याबद्दल महावितरणच्या वतीने पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे, शाखा अभियंता आकाश सोनवणे, वरिष्ठ तंत्रज्ञ किरण परिस्कर, माधुरी पाटील, सहाय्यक लेखापाल चेतन नागरे व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव विभागातील अधिकारी, कर्मचारी अभय योजनेचा प्रचार, प्रसार जोमोन करत आहेत. पात्र ग्राहकांना योजनेचे फायदे समजावून सांगितल्याने थकबाकी भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
















