मुंबई (वृत्तसंस्था) पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या जम्मू कार्यालयात अज्ञात व्यक्तींच्या गटाने जबरदस्तीने भारतीय तिरंगा फडकविला, अशी माहिती ग्रेटर काश्मीरने दिली. पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या पूर्वीच्या राज्याचा ध्वज परत आणल्याशिवाय राष्ट्रीय ध्वज फडकवणार नाही, असे सांगितले त्यानंतर एक दिवसानंतर ही घटना घडली.
या मुद्यावरून सामना अग्रलेखातून कश्मीरात आता जमीन खरेदी! .पण तिरंगा फडकेल काय? म्हणत मेहबुबा मुफ्तींचा खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून श्रीनगरच्या चौकात भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यास बंदी आहे. या मुद्यावर निशाणा साधत ‘कश्मीरात आता जमीन खरेदी! .पण तिरंगा फडकेल काय?’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख ?
370 कलमाचा निचरा करूनही कश्मीरचा प्रश्न संपला नाही. कश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले; पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे?
पंडित कधी येतील?
कश्मीर खोऱयातून 40,000 कश्मिरी पंडितांनी पलायन केले. त्यांची ‘घरवापसी’ करू व 370 कलम हटवल्यावर पंडितांना त्यांच्या घरी सहज जाता येईल असा ‘प्रपोगंडा’ केला गेला. तो चुकीचा आहे. एकही कश्मिरी पंडित अद्याप कश्मीर खोऱयात परतू शकला नाही. ‘जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है.’ ही घोषणा प्रेरणादायी आहे. पाकिस्तानप्रेमींना कश्मीरातून उखडून फेकले पाहिजे. पण पाकिस्तानचा विषय हा देशातील निवडणुकांत तोंडी लावण्याचा विषय आहे. कश्मीर हा फक्त आपल्यासाठी एक जमिनीचा तुकडा नाही, त्याहीपेक्षा बरेच काही आहे. कश्मीर ही हिंदुत्वाची, धर्माची भूमी आहे.
देव-देवतांची भूमी आहे. आता तिकडे जमिनी वगैरे खरेदी करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण चार दिवसांपूर्वीच श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या तरुणांना पोलिसांनी रोखले. तिरंगा फडकवण्यास मज्जाव केला. पुणाच्या भावना दुखावतील म्हणून हा विरोध केला? तिरंगा फडकवल्याने वातावरण बिघडेल म्हणून विरोध केला का? जमिनी खरेदी करायच्या, पण त्या जमिनीवर आमचा तिरंगा फडकवता येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकडय़ांचा उपयोग काय?