भुसावळ (प्रतिनिधी) शहरात मध्यरात्री एका इसमाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ दोन संशयितांना अटक केली असून साधारण २० वर्षापूर्वी वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने चुलत भावाच्या मदतीने हा खून केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अवघा चार वर्षाचा असतांना वडिलांचा खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याची ही रक्तरंजित कहाणी एखादं सिनेमा प्रमाणेच आहे.
नेमकं काय घडलं !
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील महात्मा फुले नगरात दिलीप रामलाल जोनवाल (वय ५१, रा. महात्मा फुले नगर) हे वास्तव्यास असून ते माहिती अधिकार कार्यकर्ता होते. दसरा असल्याने ते अकलूद येथे जेवणासाठी गेले होते. तेथून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घरी येण्यासाठ निघाले. शहरातील गरुड प्लॉट परिसरातील क्रांती चौकात दिलीप जोनवाल हे आले असता, आदिल दस्तगीर खाटीक व साजिद सागीर खाटीक (दोघ रा. गवळीवाडा) यांनी लोखंडी पाईपने जोनवाल यांना मारहाण केली. या मारहाणीत जोनवाल यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी संग्राम जोनवाल याचे फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोक्याचा चेंदामेंदा करत मेंदूच बाहेर काढला !
आदिलच्या मनात दिलीप जोनवाल यांच्याबाबत आपल्या वडिलांच्या खुनाचा राग होता, त्याने आपल्या चुलत भावाच्या मदतीने दिलीप जोनवाल यांना संपविण्याचा निर्धार केला होता. मंगळवारी रात्रीच्या सुमारास काशिनाथ लॉज परिसरात जोनवाल येताच त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. रागाच्या भरात जोनवाल यांच्यावर इतके वार केले की, जोनवाल यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होवून त्यांचा मेंदू बाहेर पडलेला होता. खून केल्यानंतर आदिलने स्वत:च्या पोटावर चाकूने वार करुन घेतल्याचे कळते. त्यामुळे त्याच्यावर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
खून का बदला खून !
माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप जोनवाल यांनी सन १९९९ मध्ये वडील दस्तगीर गफुर खाटीक यांचा खून्नसबाजीवरुन खून केल्याचा संशय आदिलला होता, त्यावेळी आदिल हा ४ वर्षांचा होता, तेव्हापासून आदिलच्या डोक्यात वडीलांच्या खूनाचा बदल्याची आग धगधगत होती. अखेर २४ वर्षानंतर आदिलने त्याच्या वडीलांचा खूनाचा बदला खूनाचेच घेतला. हत्येनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आदिल खाटीक व साजेद खाटीक या दोघांना अटक केली आहे.