भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील गडकरी नगरातील एका घरात घुसत वृध्द दाम्पत्यावर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला करून लुटमार केल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहरातील गडकरी नगरामध्ये विजय कुलकर्णी (वय ६५) आणि त्यांची पत्नी माधवी कुलकर्णी (वय ६०) हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात चोट्यांचे टोळके शिरले. त्यांनी कुलकर्णी दाम्पत्यावर धारदार शस्त्राने वार करत जखमी केले. तसेच त्यांनी घरातील सोने-चांदीचे दागिने व रोकड पोबारा केला. हल्ला झाल्यानंतर या दाम्पत्याचा आरडा-ओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी लागलीच बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पती-पत्नीला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले.
दुसरीकडे कुलकर्णी दाम्पत्याला जखमी करून लुट करणार्या टोळीने पुढील गल्लीमध्ये एका घरावर बॅटर्या चमकावत आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील रहिवासी जागे झाल्याने त्यांनी पुढे पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विजय कुलकर्णी आणि माधवी कुलकर्णी यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये पचार सुरू असून घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील हे आपल्या पथकासह भुसावळात रात्रीच दाखल झाले होते. पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा करण्याचे काम सुरु केले होते.
दरम्यान, जखमी दाम्पत्याची प्रकृती स्थिर असून चोरटे दोन असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. तर एक चोरटा सीसीटीव्हीत कैद झाल्याचेही समोर येत आहे. चोरट्यांनी एक लाखांची रोकड आणि साधारण ८० हजाराचे दागिने चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.