जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव यांनी कळविल्याप्रमाणे देशातील कोणत्याही भागात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना आत्मनिर्भर भारत किंवा राज्याच्या इतर कोणत्याही योजनेतंर्गत कोरडे शिधाजिन्न्स उपलब्ध करुन देणबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार जळगाव जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजूरांना आत्मनिर्भर भारत किंवा राज्याच्या इतर कोणत्याही योजनेतंर्गत कोरडे शिधाजिन्नस उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी तालुका तहसिल कार्यालयामार्फत माहिती संकलीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. ही माहिती गावनिहाय संकलीत करण्यात येत असून तालुक्यातील सर्व गावांची माहिती तहसिलस्तरावर संकलीत करण्यात येणार आहे.
याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, सर्वोच्च न्यायालयाकडील Suo Moto Writ Petition (CIVIL) No.६/२०२० नुसार देशातील कोणत्याही भागात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांनी त्यांची माहिती (कुटुंब संख्या आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या इत्यादी) गावातील तलाठी अथवा तालुक्याचे तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखा यांचेकडे त्वरीत द्यावी. असे आवाहन सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.