अहमदाबाद (वृत्तसंस्था) विजयादशमी अर्थात दसऱ्याची पहाटे आज (रविवार) सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
रिष्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता 3.6 इतकी होती. या भूकंपामुळे कोणतीही प्राणहानी अथवा मालमत्तेची हानी झालेली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापनाच्या सूत्रांनी सांगितले आहे. कच्छ प्रांतातील आंजर शहरापासून आग्नेय दिशेला 12 किमीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. गांधीनगर येथील भूकंपसंशोधन केंद्राच्या सूत्रांनी सांगितले आहे की, आज सकाळी झालेल्या भूकंपाने कोणतीही हानी झालेली नाही. यावर्षी झालेल्या अतिरिक्त पर्जन्यामुळे पुढील काळात आणखी धक्के बसू शकतात.
आजच्या भूकंपाची भूगर्भातील खोली 19.5 किमी इतकी होती. कच्छचे भूकवच हे भूकंपप्रवण असल्याने नजिकच्या भविष्यात सावध रहावे लागणार आहे. वर्ष 2001 च्या जानेवारी महिन्यात येथे झालेला विनाशकारी भूकंप 6.9 रिष्टर स्केल तीव्रतेचा होता, ज्यामध्ये मोठी प्राणहानी आणि मालमत्तेची हानी झाली होती.