अमरावती (वृत्तसंस्था) शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल तर स्वतःची चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. नव्याने कोरोना होणाऱ्यांमध्ये अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू ट्विट करत म्हणाले, ‘माझी कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी. आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्या.’ पहिल्यांदा बच्चू कडू यांना कोरोना झाला होता तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर कोरोना चाचणी केल्यावर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. आता पुन्हा चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली जात आहे.